उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी रुग्णालयात, प्रकृती स्थिर
Advertisement

नागपूर -राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले सलग दौरे, बैठका आणि राजकीय कार्यक्रमांमुळे शिंदे यांच्यावर प्रचंड कामाचा ताण आला होता. शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना त्यांना ताप आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागल्याने वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यांच्या प्रकृतीमुळे ठाण्यात नियोजित असलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. धुळे येथील ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला. नंतर रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिंदे गटात अधिकृत प्रवेश झाला.
दरम्यान, अलीकडील राजकीय घडामोडी, पक्षविस्तारासाठीचे दौरे आणि दिल्लीच्या वारंवार झालेल्या भेटींमुळे एकनाथ शिंदे यांचा दिनक्रम अत्यंत धावपळीचा होता. या सततच्या व्यस्ततेचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून कोणतीही गंभीर बाब नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.



