कामठीत तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला;उधारीच्या पैशांवरून वाद चिघळला

नागपूर (कामठी) : उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेत कामठी परिसरात एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पिली हवेली चौक परिसरातील एका हॉटेलजवळ हा प्रकार घडला असून, यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
माहितीनुसार, फिर्यादी मुमताज अहमद कोळसाटाळ हे आपल्या मित्र मोईनुद्दीन सलाउद्दीन शेख यांच्यासोबत पिली हवेली चौकात उभे होते. त्यावेळी इस्माईलपुरा येथील शफिक मोहम्मद रफीक अन्सारी हा तेथे आला. मोईनुद्दीन यांनी त्याच्याकडे दिलेले उधारीचे पैसे मागितले असता दोघांमध्ये वाद सुरू झाला.
वाद वाढताच आरोपीने शिवीगाळ करत संतापाच्या भरात आपल्या वाहनाच्या डिकीतून चाकू काढला आणि मोईनुद्दीन यांच्या छातीखाली वार केला. या हल्ल्यात मोईनुद्दीन गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास जुनी कामठी पोलिसांकडून सुरू आहे.
Advertisement




