पारशिवनीत वाघाचा हल्ला; गायीचा बळी, परिसरात भीतीचे वातावरण

नागपूर : पारशिवनी तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरात वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली असून, एका गायीचा बळी गेला आहे. या घटनेनंतर परिसरात वाघाची पुन्हा सक्रियता वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
माहितीनुसार, पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील शेतकरी धर्मपाल उईके यांची गाय पेंच व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या मच्छी संकलन केंद्राजवळ चरण्यासाठी गेली होती. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात गायीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पारशिवनी वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधित शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, मृत गायीची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे शेतकरी धर्मपाल उईके यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Advertisement




