Nagpur

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने राजकारण तापले; आज पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार


नवी दिल्ली : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याने केंद्र सरकारसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री साडे आठ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान, आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत या घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, विधेयक फेटाळले जाण्यामागे विरोधकांची भूमिका जबाबदार असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. महिलांच्या हक्कांबाबत विरोधकांची भूमिका नकारात्मक असल्याचा आरोप करत, त्यांनी विरोधकांना राजकीय इशाराही दिला.

कॅबिनेटमध्ये बोलताना, विरोधकांनी घेतलेला पवित्रा चुकीचा असून याचे परिणाम त्यांना आगामी काळात भोगावे लागतील, असे मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच, विरोधकांची महिलांविषयीची मानसिकता जनतेसमोर आणण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकसभेत सादर करण्यात आलेल्या या घटना दुरुस्ती विधेयकासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते. मात्र, विधेयकाच्या बाजूने २९८ आणि विरोधात २३० मते पडल्याने आवश्यक बहुमत न मिळाल्यामुळे ते नामंजूर झाले. त्यामुळे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. “एनडीएसाठी हा काळा दिवस ठरला असून सरकारला मोठा धक्का बसला आहे,” असे त्या म्हणाल्या. हा मुद्दा केवळ महिला आरक्षणाचा नसून मतदारसंघ फेररचनेशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला.

महिलांना त्यांचे हक्क तातडीने मिळावेत आणि २०२३ मध्ये मंजूर झालेला कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ घोषणांपेक्षा ठोस कृती गरजेची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)