धापेवाडा येथे भरधाव कार पलटली; मोठा अपघात टळला, सर्व प्रवासी बचावले
Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धापेवाडा परिसरात भरधाव कारचा अपघात होऊन मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. सावनेरहून कळमेश्वरकडे जात असलेली कार अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटली. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४८-सीके-१०८३ क्रमांकाची कार सावनेरहून कळमेश्वरच्या दिशेने जात होती. धापेवाडा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला पलटली.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तातडीने सावनेर पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली तसेच परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले. अपघाताचे स्वरूप गंभीर असले तरी मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेचा पुढील तपास सावनेर पोलीस करत आहेत.



