महसूल मंत्री बावनकुळे ॲक्शन मोडवर; उपविभागीय अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले
बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीदरम्यान प्रशासनातील कामकाजात गंभीर त्रुटी उघड झाल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली.
महसूल मंत्री बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर असताना चिखली येथे महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे आणि नागरिकांच्या कामांमध्ये अनावश्यक विलंब होत असल्याचे निदर्शनास आले. या परिस्थितीवर संताप व्यक्त करत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले.
त्यानंतर तातडीने निर्णय घेत उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच इतर निष्काळजी अधिकाऱ्यांनाही त्यांनी इशारा दिला की, यापुढे कामकाजात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.
“सामान्य नागरिकांची कामे वेळेत, पारदर्शक पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा अशाच प्रकारची कठोर कारवाई पुढेही करण्यात येईल,” असे स्पष्ट शब्दांत मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
Advertisement



