सोशल मीडियातून पाकिस्तानशी कनेक्शन? महाराष्ट्रात ATS ची धडक कारवाई; 160 जण ताब्यात
Advertisement

नागपूर :महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यभर मोठी समन्वित कारवाई करत 160 हून अधिक युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी गँगस्टरांच्या नेटवर्कशी संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून ATS सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होती. तपासादरम्यान पाकिस्तानस्थित गँगस्टर शहबाज भट्टी, आबिद जाट आणि राणा यांच्या नेटवर्कशी संबंधित काही संशयास्पद डिजिटल संपर्क समोर आल्यानंतर राज्यभर एकाचवेळी धडक मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत विदर्भातील 10 युवकांचाही समावेश आहे. त्यामध्ये नागपूर शहरातील 4, गोंदियातील 1, वर्ध्यातील 1, गडचिरोलीतील 1 आणि चंद्रपूरमधील 3 युवकांना चौकशीसाठी ATS ने ताब्यात घेतले आहे.
तपास यंत्रणा संबंधित युवकांचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुरावे तपासत आहेत. त्यांचे पाकिस्तानी गँगस्टर किंवा त्यांच्या भारतातील आणि पाकिस्तानातील एजंटांशी नेमके कोणत्या माध्यमातून संपर्क होते, त्यांना सोशल मीडियाद्वारे कोणत्या प्रकारच्या सूचना किंवा टास्क दिले जात होते आणि कोणत्याही बेकायदेशीर किंवा राष्ट्रविरोधी कारवायांशी त्यांचा संबंध आहे का, याचा कसून तपास सुरू आहे.
या प्रकरणात अद्याप कोणावरही औपचारिक आरोप जाहीर करण्यात आलेले नसून, चौकशीच्या निष्कर्षानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.



