नगरसेविका हर्षला जयस्वाल यांना कॉंग्रेसला साथ देणे भोवले, अपात्रतेची तलवार
नागपूर : महानगर पालिकेच्या सभागृहात प्रभाग क्रमांस ७ मधून निवडून आलेल्या बसपाच्या एकमेव नगरसेविका हर्षला संजय जयस्वाल यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान केले. त्यांची ही कृती पक्षविरोधी असल्याचे नमुद करीत बसपाचे जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी विभागीय आयुक्तांकडे त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली.
आशीनगर झोन सभापति निवडणुकीपूर्वी बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल डोंगरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी व्हीप जारी करीत मतदान न करण्याचे बजावले होते. परंतु पक्षाचा व्हीप झुगारून हर्षला जयस्वाल यांनी आशीनगर झोन सभापति निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची जाणीव त्यांना झाली होती. याप्रकरणी त्यांनी चूक कबुल करीत लेखी माफी पक्षाकडे मागितली. परंतु त्यांचा माफीनामा फेटाळण्यात आला. पक्षाने त्यांची कृती बसपाच्या मूलभूत सिद्धांत व तत्वाविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. त्यांचे विरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यासाठी एक रीतसर याचिका बसपा जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार यांनी विभागीय आयुक्तांना सादर केली आहे. ही याचिका मुंबई येथील ‘लॉ चार्टर्ड’ या ख्यातनाम कायदा संस्थेच्या वतीने बॅरि. विनोद तिवारी व अधिवक्ता शौनक कोठेकर यांचे मार्फत दाखल केली असून नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी यांचे समक्ष प्राथमिक सुनावणीही झाली. ही याचिका आता तपासणी करून सर्व संबंधितांना प्रतिवादासाठी लवकरच पाठविली जाणार आहे.
तटस्थ राहण्याचा व्हीप झुगारला
१७ एप्रिल रोजी आसीनगर झोन सभापतीपदासाठी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. बसपा प्रदेश अध्यक्ष सुनिल डोंगरे यांचे निर्देशानुसार बसपाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार यांनी या निवड प्रक्रियेत तटस्थ राहण्याचा पक्षादेश बसपा नगरसेविका हर्षला संजय जयस्वाल यांना विधिवत बजावला होता. परंतु तो आदेश झुगारून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केले. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन बसपाने हर्षला जयस्वाल यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर चौकशी समिती नेमून सुनावणी घेण्यात आली. हर्षला जयस्वाल यांनी दिलेला लेखी माफीनामा हा त्रोटक असल्याने स्वीकार केला जाऊ शकत नाही, अशी एकमुखी शिफारस चौकशी समितीने केली. या चौकशी समितीत बसपाचे वरिष्ठ नेते मोहन राइकवार, दादारावजी वूईके व संजय थूल यांचा समावेश होता. बसपाच्या प्रदेश कार्यकारणीने तो अहवाल स्वीकारून हर्षला जयस्वाल यांच्याविरुद्ध कारवाईसाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सभासद अपात्रता कायद्याखाली विभागीय आयुक्तसमोर रीतसर याचिका दाखल करण्याचे अधिकार जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार यांना प्रदान करण्यात आले. त्या अनुसार ही याचिका दाखल करण्यात आली. कायद्याचे तरतूदीनुसार ९० दिवसांत यावर निकाल अपेक्षित आहे. हर्षला जयस्वाल अपात्र ठरल्यास त्यांना ६ वर्षासाठी कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही असाही आदेश देण्यात यावा व नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याची माहिती बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी दिली.
Advertisement




