टाऊन हॉलच्या शिल्लक कामाच्या अंदाजित खर्चाचा तपशिल आठ दिवसात द्या

नागपूर ः नागपूर महानगरपालिकेचा महाल भागात उभारण्यात येत असलेल्या श्रीमंत राजे रघुजी नगरभवनाच्या उर्वरित कामाचा अंदाजित खर्चाचा एकत्रित तपशिल प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने (पीएमसी) येत्या आठ दिवसात सादर करावा, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले.
महालमध्ये उभारण्यात येत असलेल्या श्रीमंत राजे रघुजी नगर भवनाच्या बांधकामाच्या संदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज (ता. 4) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अधीक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचटवार, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, प्रकल्प अभियंता श्री. राजीव गौतम, कंत्राटदार श्री. प्रफुल देशमुख, प्रकल्प सल्लागार श्री. जितेंद्र लवांदे उपस्थित होते.
यावेळी नगर भवनच्या अंतर्गत सजावटीच्या संदर्भात पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. या टाऊन हॉलच्या बांधकाम येत्या पाच महिन्यात पूर्ण होण्याची आवश्यकता असल्याचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनानुसार वाढीव खर्चाचा एकत्रित तपशील प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने देण्याची आवश्यकता आहे. माननीय श्री. गडकरी यांनी ध्वनी व्यवस्था, आसन व्यवस्था तसेच पेंटिंग बद्दल काही बहुमूल्य सूचना केल्या होत्या. या सूचना विचारात घेऊन आता या प्रकल्पाच्या सुधारित कामाबद्दल एकत्रित अंदाजित खर्चाचा तपशील येत्या 8 दिवसात दिल्यास कामाला वेग येईल. नगरभवनच्या सभागृहाच्या छताचे डिझाईन नागपूर व विदर्भाचा सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन तयार करावे, असे निर्देश पीएमसीला देण्यात आले.
अंदाजपत्रकात खर्चाची तरतूद : नरेंद्र (बाल्या) बोरकर
मनपाच्या नगरभवनाच्या बांधकामासाठी यावर्षीच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद केल्याची माहिती यावेळी सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिली. नगरभवनच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून सुद्धा निधी मिळणार आहे. यामुळे नगर भवनाच्या बांधकामासाठी खर्चाची कोणतीही अडचण नाही. कंत्राटदाराने लिफ्ट सह इतर कामांना गती द्यावी. पीएमसीच्या अंदाजित खर्चाच्या वगळून असेलेली कामे त्वरित पूर्ण कसे होईल, यादृष्टीने काम करावे, असेही निर्देश श्री. बोरकर यांनी दिले.
Advertisement



