गोंदिया विमानतळातील बांधकाम घोटाळा? सीबीआयची कारवाई, एएआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा
Advertisement

नागपूर : गोंदिया येथील बिरसी विमानतळावरील नागरी बांधकामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) नागपूर भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने मोठी कारवाई केली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)च्या गोंदिया विमानतळावरील एजीएम (इंजिनिअरिंग-सिव्हिल) संजीव कुमार सिंह, मध्य प्रदेशातील बालाघाट येथील एम/एस रायसिंह अँड कंपनी तसेच इतर अज्ञात शासकीय अधिकारी आणि खासगी व्यक्तींविरुद्ध नियमित गुन्हा (Regular Case) दाखल करण्यात आला आहे.
CBIच्या प्राथमिक तपासानुसार, बिरसी विमानतळावरील नागरी बांधकामांच्या कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने कामे करून शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात कंत्राट मंजुरी, कामांची अंमलबजावणी, आर्थिक व्यवहार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आणखी काही अधिकारी किंवा खासगी व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता असून, CBIकडून संबंधित कागदपत्रे आणि व्यवहारांची पडताळणी सुरू आहे. तपासाच्या निष्कर्षानंतरच पुढील कारवाई निश्चित होणार आहे.



