लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार;फेब्रुवारी-मार्चचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता!

नागपूर – राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मार्च महिना संपत आला तरी फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते न मिळाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केली होती. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु, मागील काही महिन्यांपासून हप्ते उशिराने मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. जानेवारीचा हप्ता देखील फेब्रुवारीत जमा झाला होता. त्यानंतर आता सलग दोन महिन्यांचा हप्ता प्रलंबित राहिल्याने लाभार्थींमध्ये नाराजी वाढली आहे.
दरम्यान, महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित स्वरूपात देण्याची शक्यता आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम १५ एप्रिलपूर्वी जमा होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाभार्थींना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक-
योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी पूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे काहींचा लाभही थांबला होता.
आता या चुका सुधारण्यासाठी महिलांना शेवटची संधी देण्यात आली असून, मार्चअखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीनंतरही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास संबंधित महिलांचा योजनेतील लाभ कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%
