भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरण; HIV अहवाल आला समोर, आर्थिक व्यवहारांवरही तपासाचे सावट!

मुंबई : विधींच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात नवा तपशील समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या HIV चाचणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत समस्या सोडवण्याच्या नावाखाली अनेक महिलांना जाळ्यात ओढले. वाईट घडण्याची भीती दाखवून तसेच विविध कथित ‘विधी’ करण्याच्या बहाण्याने त्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले. या कृत्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला मोठे गांभीर्य प्राप्त झाले.
एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सखोल तपास करत खरातला अटक केली. त्याने अनेक महिलांशी संबंध ठेवल्याचा आरोप असल्याने HIV संसर्गाबाबतही भीती व्यक्त केली जात होती. मात्र, तपासानंतर आलेल्या अहवालात तो निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, या प्रकरणाला आता आर्थिक गैरव्यवहारांचा धागाही जोडला जात आहे. खरातच्या कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी सक्त वसुली संचलनालय (ED), विदेशी चलन विभाग (फॉरेक्स) आणि कस्टम विभाग सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्याच्या मालमत्ता, परदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची तपासणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच, परदेशातून आणलेल्या वस्तूंवर कस्टम ड्युटी भरली का याचाही तपास केला जाणार आहे. बनावट रत्न, खडे, तसेच इतर वस्तू विक्रीतून उभारलेल्या संपत्तीचाही मागोवा घेतला जात असून, या संपूर्ण प्रकरणात पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Advertisement




